गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा तालुक्यात परिचारिकेला अश्लील मेसेजेस करून शरीर सुखाची मागणी करून तिला आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना अखेर सरकारने निलंबित केले आहे. मुलचेरा तालुक्यात एका उपकेंद्रात कार्यरत परिचारिकेचे वेतन वाढ रोखून तिला मोबाईल वरून अश्लील मेसेजेस पाठवून सतत शरीर सुखाची मागणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री यांनी केली होती.
advertisement
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून अखेर परिचारिकेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिचारिकेवर सध्या उपचार सुरू असून विविध गंभीर कलमान्वये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे..दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या संपूर्ण कृत्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री यांच्या निलंबनाची शिफारस सरकारकडे केली होती. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज मूलचेराचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
अखेर आज कारवाई
या प्रकरणातील अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स समोर आल्यानंतर आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली. परिचारिकेच्या पतीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर पैसे नको, मला तूच पाहिजेस, असा कथित घृणास्पद दबाव टाकल्याचा थेट आरोप केला असून संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पीडितेच्या पतीने केली होती. पीडित परिचारिकेचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर याआधीही गंभीर आरोप करण्यात आले. मात्र वरिष्ठांच्या पाठबळामुळे कोणतीही कारवाई न झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होती. अखेर आज कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पीडित महिला तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत आहे. त्यांची दोन वर्षापासून वेतनवाढ थांबवण्यात आली होती. त्यामुळे त्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना व्हाट्सअप मॅसेजवरून संपर्क करायच्या. मात्र तालुका आरोग्य अधिकाऱ्याने चॅटिंगद्वारे शरीर सुखाची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिचारिका कर्तव्य पार पाडल्यानंतर घरी परतली. ती प्रचंड तणावात होती. रात्री जेवण करून पतीला झोप लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले.
