मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील कोळी कुटुंब घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निमखेडी शिवारातील नवीन बायपासलगत असलेल्या गिरणा नदीवर गेले होते. यावेळी गणेश कोळी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी मूर्ती घेऊन नदीपात्रात उतरला. मात्र, गिरणा धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि प्रवाहाच्या वेगामुळे वाहून गेला.
advertisement
हा सगळा प्रकार कुटुंबाच्या डोळ्यादेखत घडला. मुलाला अशाप्रकारे वाहून जाताना पाहून कुटुंबीयांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला. त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि इतर संबंधित विभागांच्या मदतीने पोलिसांनी गणेश काळेचा शोध सुरू केला. मात्र, धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत.
रविवारी सकाळपासूनच गिरणा नदीकाठावरील आव्हाणे, निमखेडी आणि कानडदा या गावांजवळील नदीपात्रातही गणेशचा शोध घेतला जात आहे. गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले असून त्यातून 9768 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. गणेश विसर्जनासाठी गेलेला गणेश अशाप्रकारे वाहून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.