अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या मालकीच्या असलेल्या कारने पुण्यात एका कारला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला. गौतमी पाटीलला अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना पुणे पोलिसांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
advertisement
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला होता. गौतमी पाटीलच्या मालकीच्या असलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे जखमी झाले होते. अपघातानंतर गाडीतील लोक थेट उतरून निघून गेले आणि रिक्षाचालक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडून राहिला. स्थानिकांनी रिक्षाचालकाला तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळातच अपघातग्रस्त गाडी तिथून टोईंग व्हॅनद्वारे नेण्यात आली.
जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी फक्त कारवाई नाही, तर गौतमी पाटीलवर त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. तर, दुसरीकडे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती दिली आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असून गौतमीला दिलासा मिळाला आहे.
पुणे पोलिसांनी सखोल चौकशी करून गौतमी पाटीलला क्लीन चीट दिली आहे. पोलिसांनी तपासात स्पष्ट केलं आहे की, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील घटनास्थळी किंवा संबंधित वाहनात नव्हती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि वाहनचालकांच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेतला. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालात गौतमी पाटीलचा कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.
अपघातानंतर काही सोशल मीडिया पोस्ट आणि अफवांमुळे गौतमी पाटीलचं नाव या घटनेत ओढलं गेलं होतं. मात्र पोलिसांच्या तपासानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.