ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. छत्तीसगड पासिंगची (क्रमांक CG 04 NA 7776) कांकेर ट्रॅव्हल्स ही प्रवासी बस रायपूरहून हैदराबादच्या दिशेने जात होती. रवी सपाटे यांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या माहितीनुसार, सौंदडजवळ रेल्वे फाटक ओलांडत असताना अचानक बसमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. प्रसंगावधान राखत बस चालकाने तत्काळ गाडी थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर उतरण्यास सांगितले.
advertisement
गोंदियाचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी बसमधून उतरताच काही क्षणांतच बसने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.या आगीच्या भक्ष्यस्थानी बसमधील प्रवाशांचे कपडे, बॅगा आणि इतर मौल्यवान वस्तूंसह सर्व साहित्य जळून राख झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे मोठे आश्चर्य आहे. मात्र, बसमधील प्रवाशांनी अनुभवलेला थरार आणि त्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता, ही घटना नक्कीच भीतीदायक आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.