सकाळचा तो प्रसंग अन् काळजाचा थरकाप
शिवशंकर रहांगडाले यांचे घर जंगलाला लागूनच आहे. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हुडहुडी भरवणारी थंडी असल्याने शिवशंकर आणि त्यांची पत्नी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह, हियांशसह अंगणात चुलीजवळ शेकत बसले होते.
गप्पा मारताना दबा धरलेल्या बिबट्याने पळवला काळजाचा तुकडा
कुटूंब गप्पा मारत असतानाच अचानक झुडपातून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेतली. काही समजण्याच्या आतच बिबट्याने हियांशची मान पकडली आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. आई-वडिलांनी जीवाच्या आकांताने ओरडत बिबट्याचा पाठलाग केला, पण निसर्गाच्या या हिंस्त्र रुपासमोर त्यांचं काहीच चाललं नाही.
advertisement
तीन वर्षांच्या चिमुकल्याला थंडी वाजते म्हणून आई वडिलांनी शेकोटीजवळ बसवलं. काळजचा तुकडा त्यांच्या जवळ बसला होता. मात्र तोच तुकडा नरभक्षक बिबट्याने ओरबाडून नेला. आई वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकल्याला उचलून नेलं. आई वडिलांनी चिमुकल्याचा रक्तबंबाळ मृतदेह पकडून टाहो फोडला.
वारंवार तक्रारी करूनही वनविभाग झोपलेलं?
या घटनेनंतर खडकी परिसरात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. "आम्ही अनेकदा वनविभागाला सांगितलं होतं की आमची लेकरं धोक्यात आहेत, पण त्यांनी दखल घेतली नाही," असा संतप्त आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वीच इंदुरा गावात एका ९ वर्षांच्या मुलीचा असाच बळी गेला होता, तरीही वनविभागाने कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत.
हियांश परत येणार नाही, पण जबाबदार कोण?
हियांश आता या जगात नाही, पण त्याच्या मृत्यूने प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. या नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करा आणि रहांगडाले कुटुंबाला योग्य न्याय द्या, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर आता तरी वनविभाग जागा होणार का? हाच प्रश्न सध्या विचारला जात आहे.
