नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डांगोर्ली येथील रिया फाये या महिलेने त्यांचे २० दिवसांचे बाळ अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि अवघ्या २४ तासांत या खोट्या अपहरण प्रकरणाचे सत्य उघडकीस आणलं.
advertisement
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती, साक्षीदारांची चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती दिली. या तपासामध्ये पोलिसांचा संशय थेट तक्रारदार आईवरच गडद झाला. पोलिसांनी रिया फाये यांची कसून चौकशी केली असता, तिने अखेरीस गुन्हा कबूल केला.
आरोपी आई रिया फाये हिने पोलिसांना सांगितले की, तिला बाळ नको होते, कारण तिला नोकरी करायची होती. नोकरीच्या आड बाळ येत असल्याने तिने हे क्रूर कृत्य करण्याचे ठरवले. १७ नोव्हेंबरच्या रात्री संधी साधून तिने स्वतःच्या २० दिवसांच्या नवजात मुलाला वैनगंगा नदीच्या पात्रात फेकून ठार मारले. त्यानंतर तिने बाळाच्या अपहरणाचे नाटक रचले.
LCB ची वेगवान कारवाई
गुन्हा कबूल झाल्यानंतर गोंदिया पोलिसांनी तातडीने बचाव पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने वैनगंगा नदीच्या पात्रात बाळाच्या मृतदेहाचा शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना त्या नवजात बाळाचा मृतदेह शोधण्यात यश आले. नोकरी करता यावी, या क्षुल्लक कारणासाठी जन्मदात्या आईनेच पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने गोंदिया जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी आई रिया फाये हिला अटक केली असून, पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
