गोंदियाचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार कालव्यात आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. प्रशांत पटले (21) आणि प्रतीक बिसेन (21) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि प्रतीक हे दोघे मित्र कालव्यात आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात वाहून गेले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने शोधकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह घटनास्थळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर सापडले. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या माहितीनुसार दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नदी, तलाव आणि कालव्यांसारख्या ठिकाणी आंघोळ करताना अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा योग्य अंदाज घेऊनच पाण्यात उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पाण्याच्या ठिकाणी एकट्याने न जाता शक्यतोवर सोबत अनुभवी व्यक्ती असावी, असेही सांगण्यात आले आहे.