चांदनी किशोर शहारे असं मृत पावलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. ती मुरडोली येथील शिवराम कॉलेजमध्ये इयत्ता 11वीमध्ये शिकत होती. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता ती अभ्यास करण्यासाठी उठली होती. थंडीचे दिवस असल्याने थंडीपासून वाचण्यासाठी ती चुलीजवळ बसून अभ्यास करत होती. दरम्यान, अचानक लागलेल्या आगीमुळे चांदनी भाजली.
गंभीर अवस्थेत तिला प्रथम देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने नंतर तिला गोंदियाला हलवण्यात आलं. इथेही तिच्यावर योग्य उपचार मिळू शकला नाही. प्रकृती खालावत चालल्याने तिला पुन्हा नागपूरला रेफर करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चांदनीचा शनिवारी पहाटे चार वाजता नागपूरच्या मेयो रुग्णालयात मृत्यू झाला.
advertisement
होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थिनीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.