सोलापूर : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. परंतु फूलविक्रेते मात्र निराश होते. गणेशोत्सव अगदी 4 दिवसांवर असतानाही फुलांना भाव मिळत नव्हता. त्यामुळे निदान गणेशोत्सवात तरी फूलविक्री चांगल्या किंमतीत होईल, अशी आशा विक्रेत्यांना होती. शेवटी बाप्पानं त्यांची प्रार्थना ऐकली असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
काहीजण अत्यंत साधं आणि सुरेख मखर सजवतात, तर यंदा आपलं मखर हटके आणि सर्वात भारी असायला हवं यासाठी काहीजणांचा अट्टाहास असतो. साधं किंवा भारी, मखर कसंही असलं तरी सजावटीसाठी, पूजेसाठी फुलं लागतात. सणावाराच्या काळात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. श्रावण महिन्याच्या सुरूवातीला या फुलांची किंमत 70 ते 80 रुपये प्रति किलो होती जी नंतर पार 30 ते 40 रुपयांवर घसरली. गुलाब आणि इतर काही फुलांच्या किंमतीही कमी झाल्या.
आता मात्र लाडक्या गणरायाच्या नित्य पूजेसाठी, सजावटीसाठी हार, फुलं लागत असल्यानं घाऊकसह किरकोळ बाजारात फुलांसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे जवळपास सर्व फुलांना आता चांगलाच भाव आलाय. झेंडू, गुलछडी, गुलाब, शेवंतीचे दर वाढले आहेत. अर्थात फूल विक्रेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूरचे फूल विक्रेते अब्दुल रहिमान इनामदार यांनी याबाबत माहिती दिली.
'गणपती सजावटीत विशेषतः जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन, आर्केड, ग्लेडिओ, शेवंती, गुलछडी, झेंडू या फुलांचा अधिक वापर केला जातो. गणरायाचं आगमन झाल्यापासून वाढीव दरानं का होईना पण ग्राहक फुलं खरेदी करताहेत. पावसामुळे फुलांच्या पिकांचं नुकसान झाल्यानं उत्पादनात मोठी घट झाली. कर्नाटकातील बंगळुरू, म्हैसूर इथून फुलांची आवक होते. गणेशोत्सवामुळे फुलांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून फुलांना दुप्पट मागणी मिळतेय. त्यामुळे भावही वाढला आहे. शेवंती 400 ते 450 रुपये किलो, बटन गुलाब 350 ते 400 रुपये किलो, झेंडू 100 रुपये किलो आणि गुलाब 300 ते 400 रुपये किलो दरानं विकले जात आहेत. त्यामुळे फुलांचे 4 ते 5 हार घेणारे ग्राहक 1 ते 2 हार घेत आहेत. परंतु फुलांची दरवाढ गणेशोत्सवात अशीच राहणार', असं अब्दुल रहिमान इनामदार यांनी सांगितलं.