या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केला आहे. पोलीस तपासातून पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे अनेक ठिकाणी एकत्र राहिल्याचे समोर आले आहे. दोघांच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून अनेक नवीन खुलासे समोर आले आहेत. यात गोविंद बर्गे याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे बर्गे यांनी स्वत:च स्वत:वर गोळी झाडून घेतली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे त्यांच्या घातपाताचा जो संशय व्यक्त केला जात होता. त्यामध्ये काही तथ्य नसावं, अशी चर्चा आहे. पोलीस सविस्तर तपास करत आहेत.
advertisement
याशिवाय, पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गेच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबींचा छडा लावला आहे. तसेच, पूजा गायकवाडसोबत काम करणाऱ्या काही सहकारी आणि मैत्रिणींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी, या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचे पोलिसांचे हक्क कायम आहेत. पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंवर अधिक तपास करत आहेत. गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत.