मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी येथील रहिवासी चार वर्षीय ओम हरीश वांगे हा आपल्या घराबाहेर पिचकारीने होळी खेळत होता. परिसरात सर्वत्र होळीचा उत्साह दिसत असताना ओमही इतर मुलांप्रमाणे आनंदाने रंग उधळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे घेऊन येत होत्या.
नातू 45 टक्के भाजला
advertisement
ओम खेळत असताना त्याने नकळत पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. मात्र, या क्षुल्लक प्रकारामुळे संतापलेल्या सिंधू ठाकरे यांनी क्षणाचाही विचार न करता हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट नातवाच्या अंगावर ओतली. अचानक अंगावर पडलेल्या गरम पाण्यामुळे ओम वेदनेने विव्हळू लागला. पाण्याचा चटका इतका तीव्र होता की त्याच्या कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजला. मुलाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्य तातडीने बाहेर धावून आले. त्यांनी ओमला त्वरित जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार, ओम सुमारे 45 टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. ओमचे वडील वेकोलीमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये रागाच्या भरात पाणी ओतल्यानंतर आजीने पुन्हा नातीच्या हातातील थंड पाण्याची बादली घेऊन ती ओमवर ओतल्याचेही दिसून येते. मात्र तोपर्यंत मुलगा गंभीररीत्या भाजला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
