कारमध्ये धूर करून संपवलं आयुष्य
सचिन जाधवर यांचा मृतदेह शनिवारी दुपारी त्यांच्याच बंद कारमध्ये आढळून आला. आत्महत्येसाठी त्यांनी अत्यंत टोकाचा मार्ग अवलंबला. कारच्या काचा बंद करून आतमध्ये एका मडक्यात कोळसा आणि लाकूड पेटवून धूर केला आणि त्या गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
advertisement
सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांचे नाव
पोलिसांना कारमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे जबाबदार असल्याचे जाधवर यांनी नमूद केले आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दिलीप फाटे यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पत्नीने दिली होती बेपत्ता असल्याची तक्रार
सचिन जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चुंब गावचे रहिवासी होते. ते शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांचे फोन लागत नसल्याने आणि घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी मयूरी जाधवर यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, शनिवारी त्यांचा मृतदेहच आढळल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
२०१२ च्या परीक्षेत राज्यात आले होते पहिले
सचिन जाधवर हे अत्यंत हुशार अधिकारी म्हणून ओळखले जात होते. २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. एका गुणवत्ताधारक अधिकाऱ्याने अशा प्रकारे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपले आयुष्य संपवल्याने महसूल विभागात संताप व्यक्त केला जात आहे.
