नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावनगाव, मुक्रमाबाद येथे पाहणी केली. मुख्यमंत्र्यांची चर्चा करून पूरग्रस्तांना तातडीने जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू, असे पालकमंत्री अतुल सावे म्हणाले.
लंडनमध्ये होतो पण रोज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घ्यायचो
advertisement
गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकर मार्गी लावू. लेंढी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्याबाबत गावकऱ्यांचा रोष आहे. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करू असे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. पालकमंत्री सावे विदेशात असल्याने विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. त्यावरही सावे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तरे दिली, ते म्हणाले, मी लंडनला गेलो होतो. एका मराठी दैनिकाच्या कार्यक्रमाला मला बोलावले होते. तसेच पत्नीवर उपचार देखील करायचे होते . मी विदेशात असताना रोज नांदेड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करीत होतो. परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. काल मी परत आलो आणि आज लगोलग पूरग्रस्त गावांना भेटी देत आहे, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलीये
अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना अतुल सावे यांनी सांगितले.