ॲड. गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे आले असता यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताफ्यावर काहींनी हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात सदावर्ते यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही इजा झाली नाही. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेत घेऊन सदावर्ते यांना जालन्याच्या उपोषण स्थळी सुखरूपपणे पोहोचवले.
समाजकंटक, नालायक, जरांगेंचे दलाल, सदावर्ते हल्लेखोरांवर भडकले
advertisement
उपोषणस्थळी आंदोलकांची भेट घेऊन सदावर्ते यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काही समाजकंटक नालायक, जरांगेंचे दलाल असे भ्याड हल्ले करतात. परंतु असल्या भ्याड हल्ल्यांनी माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा थेट इशारा त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल
समाजहिताचे काम करायला निघाल्यावर काही समाजकंटक अडथळे निर्माण करतात. हे अतिरेकी विचारांचे लोक असून हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून पोलीस पुढची कारवाई करतील, असे सदावर्ते म्हणाले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विशेष करून वैयक्तिक लक्ष्य केले. मी चपटीवाला नाही, टिप्परवाल नाही. इथे केवळ कायद्याने आणि अभ्यासाने युक्तिवाद होतो, असे म्हणून सदावर्ते यांनी जरांगे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
मंठ्यात गुणरत्न सदावर्ते यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
जालन्यातील मंठ्यात मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांना काळे झेंडे दाखवले आहेत. सदावर्ते हे जालन्यातून नांदेडच्या दिशेने जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले तसेच घोषणाबाजी करत सदावर्ते यांचा निषेध नोंदवला