महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कूपर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा (एचएमआयएस) प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अन्य रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. महापालिकेच्या कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष किती वाजेपर्यंत सुरू असतो, रुग्णवाहिका किती वेळात उपलब्ध होईल, अशी विविध स्वरुपाची माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे.
advertisement
E-bike Taxi: ई-बाइक टॅक्सीला हिरवा कंदील, किती असेल भाडं? वाचा A टू Z माहिती
गेल्या काही दिवासांपासून कूपर रुग्णालय सातत्याने चर्चेत आहे. तिथे रुग्णांना उंदीर चावल्याचं प्रकरण घडलं होतं. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघाडे आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय मोहिते यांनी गुरुवारी (25 सप्टेंबर) संवादसत्राचं आयोजन केलं होतं. यावेळी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमधील विविध मुद्दे तसेच अन्य रुग्णालयांतील सेवा सुविधा, मनुष्यबळ उपलब्धता, झीरो प्रिस्क्रिप्शन योजना, भविष्यात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
रुग्णालये आणि आरोग्य सुविधांमध्ये रुग्णांसंबंधित डेटा गोळा करणे, त्याचं विश्लेषण करणे आणि प्रशासकीय कामांना सुलभ करण्यासाठी एचएमआयएस प्रणालीचा उपयोग होतो. ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे. जी रुग्णांच्या उपचारांची प्रक्रिया सुधारते आणि रुग्णालयांना आवश्यक डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत करते. पालिकेच्या अन्य चार रुग्णालयांप्रमाणे 'केईएम'मध्येही प्रायोगिक तत्त्वावर 'एचएमआयएस' प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, कूपर रुग्णालयात येत्या तीन महिन्यांत किमोथेरपी सेंटर सुरू केलं जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत. नायर कॅन्सर रुग्णालयाच्या 10 मजली इमारतीच्या 6 मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झालं आहे. ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.