कोकण किनारपट्टीला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीला हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा अति वेगाने येत असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात बारा तासाहून अधिक काळ जोरदार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, समुद्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक बदल आढळून येत असल्याने समुद्राला जोरदार करंट आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
advertisement
अंजर्ल खाडीत 800 बोटी आश्रयाला
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरातील बोटी अंजर्ल खाडीत 800 आश्रयाला आल्या आहेत. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी सुरक्षित स्थळी परतल्या आहेत. काही बोटीने जयगड खाडीचा आसरा घेतला आहे तर काही बोटींनी अंजर्ल खाडीत आश्रय घेतला आहे. हर्णै बंदरात जेट्टी नसल्याने समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थिती व चक्रीवादळासारख्या परिस्थितीत बोटी सुरक्षित स्थळी लावण्यासाठी खाडीचा आसरा घ्यावा लागत आहे. वातावरण शांत होईपर्यंत कोणीही मासेमारीला जाऊ नये, अशा प्रकारचे आदेश देण्यात आल्याने मासेमारी बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत तर दुसरीकडे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्याने जिल्ह्याची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या असणार आहेत.
वाचा - रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा तडाखा! केळशी गाव तिहेरी संकटात, पुराचा विळखा, दरडही कोसळली
ढगफुटी सदृश पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यातील कासवांचे गाव अशी ओळख असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास गावाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. ढगफुटी सदृश पाऊस पडत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 1950 साली अश्या प्रकारे पाऊस पडून घरे वाहून गेली होती, त्याची पुनरावृत्ती होईल की काय अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. नदीतील गाळ न काढल्याने पुराचे पाणी नदीपात्रात बाहेर जाऊन वेळास गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळास गावातील रस्ते पूर्णपणे जलमय झालेत, अनेकांच्या घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी घुसले आहे. एकीकडे समुद्राला मोठ्या प्रमाणात उधान आहे तर दुसरीकडे नदीच्या पुराचे पाणी थेट गावात शिरत असल्याने नागरिक अडकले आहेत.