नांदेड जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस सुरू आहे. अशातच कंधार तालुक्यातील कोटबाजार गावामध्ये अंगावर भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. शेख नासेर आणि त्यांची पत्नी शेख हसीना यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शेख नासेर यांचं कोटबाजारात मातीचं घर आहे. संततधार पावसामुळे कच्च्या मातीची भिंती कमकुवत झाली. त्यातून ही घटना घडली. शुक्रवारी रात्री शेख नासेर त्यांच्या पत्नी शेख हसीना झोपलेले असताना अंगावर भिंत पडली. यात दोन्ही वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
advertisement
किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस, रिकामी स्कूल बस पुराच्या पाण्यात अडकली
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला आहे. बोधडी ते सिंदगी रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याचा जोर वाढल्यानं काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली, नंतर एका ठिकाणी अडकली. बसमध्ये चालकाशिवाय कोणी नव्हतं. दरम्यान, बसचाचालक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. कोठारी नदीला देखील पूर आला आहे. या पुराचे पाणी शेतात शिरले असून परिसरातील शेती जलमय झाली आहे.
हिमायतनगर तालुक्यात सखल भागात साचले पाणी
तर जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे हिमायतनगर शहरांतील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलं आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे. शिवाय तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पिकांचं देखील नुकसान झालं आहे.