प्रयागराजच्या कुंभ मेळ्यात झालेल्या बैठकीबद्दल माहिती देताना गोविंद शेंडे यांनी सांगितलं की, प्रयागराजमध्ये केंद्रीय मार्गदर्शन मंडळामध्ये आलेल्या संतांनी हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हिंदूंची लोकसंख्या ८४ टक्के होती. आता ही टक्केवारी ७८ ते ७९ टक्क्यांवर आली आहे. अशीच घट होत राहिली तर हिंदूंचं काय? याबाबत बैठकीत चिंता व्यक्त केली. हिंदू युवकांनी किमान दोन किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घातली पाहिजे. मागच्या काही वर्षात लोकसंख्या कमी करण्याची काही धोरणं आपल्याकडे आली. आधी हम दो हमारे दो, अशी घोषणा देण्यात आली. त्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिपची संकल्पना आली. यामुळे लोक मजामस्ती करतात, पण अपत्य जन्माला घालत नाहीत. याच कारणांमुळे हिंदूंची लोकसंख्या कमी झालीय, असंही गोविंद शेंडे म्हणाले.
advertisement
केंद्रीय बैठकीत झालेल्या प्रस्तावाबद्दल माहिती देताना शेंडे पुढे म्हणाले, “हिंदू तरुणांनी लवकर लग्न करावं आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा, असा प्रस्ताव विश्व हिंदू परिषदेच्या प्रयागराज येथील ‘कुंभ’तील केंद्रीय बैठकीत पारीत करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांनी हिंदूंची लोकसंख्या वाढीचं मिशन हाती घेतलं आहे. भारतातील लोकसंख्या असंतुलन हिंदूंच्या अस्तित्वासाठी घातक आहे.
"शिकेलेली मुलं उशीरा लग्न करतात, अपत्य होऊ देत नाही. झालं तर एक अपत्य जन्माला घालतात. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी झालीय. दुसरे समाज त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत. हिंदूंची तुलनेने कमी होत असल्याने संत समाज चिंतेत आहे. दोन अपत्यची मागणी व्यावहारिक होण्यासाठी शिक्षण, आरोग्य, महागाई कमी व्हायला हवी, ही मागणी देखील विहिप करणार आहे. हिंदू तरुणांनी व्यसनाधीनता सोडावी. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू नये, त्यांनी दोन किंवा दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म द्यावा," असंही शेंडेंनी सांगितलं.