तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला गुलाल हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो. झेंडू, गुलाब, पळस यांसारख्या फुलांपासून, हळदीपासून किंवा इतर औषधी वनस्पतींपासून तयार केलेला गुलाल त्वचेसाठी सौम्य आणि आरोग्यदायी असतो. हा गुलाल केवळ रंगाची शोभा वाढवत नाही, तर त्वचेला किंवा केसांना कोणतीही हानी पोहोचवत नाही. याउलट रासायनिक गुलाल स्पर्शाला खडबडीत भासतो. त्याला तीव्र वास असतो आणि तो शरीरासाठी हानिकारक ठरतो. त्यामुळे गुलाल घेताना त्याचा दर्जा आणि घटक तपासणं गरजेचं आहे.
advertisement
Ganesh Chaturthi 2025: गौरी-गणपती सजावटीसाठी साहित्य हवंय? मुंबईतील सगळ्यात स्वस्त 5 ठिकाणं
बाजारात अनेक ब्रँडेड तसेच ऑरगॅनिक गुलाल उपलब्ध होत आहेत. 'स्किन-फ्रेंडली', 'हर्बल' किंवा 'ऑरगॅनिक' असे लेबल असलेला गुलाल खरेदी करणं जास्त सुरक्षित ठरतं. तसेच उघड्यावर ढिग लावून विकला जाणारा गुलाल खरेदी करणं टाळावं. त्यात धूळ, रंगीत पावडर, प्लॅस्टर यांसारखे घातक घटक असण्याची शक्यता असते. गुलाल खरेदी करताना त्याचा वास, स्पर्श आणि पॅकेजिंग हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
घरच्या घरी गुलाल तयार करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरू शकतो. हळद व बेसन यांचं मिश्रण करून पिवळा रंग सहज तयार करता येतो. गुलाब किंवा झेंडूच्या वाळलेल्या पाकळ्या वाटून त्यात पीठ मिसळल्यास गुलाबी किंवा केशरी रंग तयार होतो. बीटरूट पावडरमध्ये रवा किंवा बेसन मिसळल्यास सुंदर लाल रंग मिळतो. अशा प्रकारे घरगुती गुलालामुळे आरोग्याचं रक्षण होतं आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता येतो.
एकूणच, गणेशोत्सवात उत्साह आणि श्रद्धा जितकी महत्त्वाची आहे तितकीच सुरक्षितताही महत्त्वाची आहे. गुलाल हा आनंदाचा भाग असला तरी त्याची निवड चुकीची ठरल्यास त्वचेवर किंवा केसांवर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा करताना रासायनिक गुलाल न घेता नैसर्गिक किंवा घरगुती गुलालाच प्राधान्य द्यावे.