जळगाव : विवाहबाह्य संबंधातून तरुणांकडून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका महिलेने आपल्या पतीसह मिळून प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा 3 या गावात उघडकीस आली आहे. संजय जाधव आणि सोनाली जाधव असे संशयित आरोपी पती-पत्नीचे तर विजय राठोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पती-पत्नीने खून केल्याचे कबूल केले असले तरी मृतदेहाची विल्हेवाट आणि खून नेमका कसा केला याबाबत वेगवेगळ्या कहाण्या सांगत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा गुंता दृश्यम सिनेमाप्रमाणे वाढल्यामुळे पोलिसांचे डोके देखील चक्रावले आहे.
advertisement
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीत वरसाडे तांडा येथील विजय भिमा राठोड (वय 25) हा २४ फेब्रुवारीच्या रात्री घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. याबाबत त्याचा भाऊ संजय राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून २६ फेब्रुवारी रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय परशुराम जाधव याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी चौकशीत त्याने पत्नी सोनाली जाधव हिचे विजय राठोड याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत दोघांनी मिळून त्याचा खून केल्याची कबुली दिली. मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ काढून धमकावत असल्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याचेही त्याने सांगितले.
पती पत्नीचा जबाब वेगवेगळा
दरम्यान, खून कसा केला आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत आरोपी पती-पत्नी पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगत आहेत. कधी गळा आवळून खून केल्याचे, कधी हात-पाय बांधून गळा आवळल्याचे तर कधी लोखंडी हत्याराने वार केल्याचे ते सांगत आहेत. मृतदेह जाळला, जंगलात फेकला किंवा जाळल्यानंतर राख टाकली अशा तीन वेगवेगळ्या माहितीही त्यांनी दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा गुंता दृश्यम सिनेमाप्रमाणे वाढल्यामुळे पोलिसांचे डोके देखील चक्रावले आहे .
पाच दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणात पोलिसांनी संजय जाधव आणि सोनाली जाधव या दोघांना अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. मात्र या प्रकारानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
