आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश शरीरातील मेलाटोनिन या झोप नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे प्रमाण कमी करतो. मेलाटोनिन कमी झाल्यास झोप येण्यास उशीर होतो आणि झोपेची गुणवत्ता खालावते. मेंदू सतत उत्तेजित अवस्थेत राहिल्याने शरीराला आराम मिळत नाही. अनेक जण फक्त पाच मिनिटे म्हणून मोबाईल हातात घेतात, मात्र नकळत एक ते दोन तास निघून जातात. ही सवय दीर्घकाळ टिकल्यास झोपेचा तुटवडा निर्माण होतो.
advertisement
झोप अपुरी राहिल्यास त्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी स्पष्ट दिसून येतात. सकाळी उठताना थकवा, डोकेदुखी, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासावर विपरीत परिणाम होतो, तर प्रौढांमध्ये कामाची कार्यक्षमता कमी होते. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास स्मरणशक्ती घटणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. अपुरी झोप ताण, चिंता आणि नैराश्य वाढवू शकते. सतत स्क्रीनकडे पाहण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोळे कोरडे पडण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे झोपेच्या आधी मोबाईल वापर मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
यासाठी झोपेच्या किमान एक तास आधी मोबाईल वापर टाळणे, निळा प्रकाश कमी करणारी सुविधा वापरणे आणि निश्चित झोपेची वेळ पाळणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे, हलके संगीत ऐकणे किंवा ध्यानधारणा करणे यांसारख्या सवयी लावल्यास मेंदू शांत होतो आणि झोप अधिक चांगली लागते. योग्य आणि पुरेशी झोप ही निरोगी जीवनशैलीचा पाया असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.





