वाशिम : लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट न दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी नाराज झाल्या होत्या. अखेरीस गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षाने जो उमेदवार दिला आहे, त्याचा आता प्रचार करणार आहे, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
advertisement
'मी सर्वात प्रथम 96 मध्ये मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना हरवून शिवसेनेचा झेंडा रोवला. 17 वर्ष विरोधात असतांना पूर्णा खंडवा या रेल्वे चे ब्रॉड गेज आणि electrification चे काम केलं. यवतमाळ जिल्ह्यात महामार्गाचे जाळे विणलं. शकुंतला रेल्वेचे पुर्नजीववन मीच केलं. पैनगंगा सह इतर नदीवरील बॅरेजेसचे काम केलं. यवतमाळ- वाशिममध्ये मेडीकल सुविधा आणि कॉलेज ची कामे केली. आता या निवडणुकीत मला तिकीट दिले नाही म्हणून मी नाराज नाही, असं गवळी यांनी स्पष्ट केलं.
'मी 25 वर्ष काम केले तरी तिकीट न दिल्याने त्याची खंत वाटत आहे. पण महायुतीचा धर्म मी पाळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यायचं आहे. मी महायुतीच्या उमेदवारासाठी आजपासून प्रचार करणार आहे. मोदी यांच्यासाठी 400 पार करण्यासाठी महायुती च्या जयश्री पाटील यांचा प्रचार करणार आहे, मला काय मिळते त्या ऐवजी मी पक्षासाठी आणि जनतेसाठी काय देणार यावर मी कायम भर दिला आहे, असंही गवळी म्हणाल्या.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चांगली चर्चा झाली. जयश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकली आहे. मीच प्रसिद्धीच्या मागे लागली नाही त्यामुळेच माझे काम दिसत नसावे. पुढची जबाबदारी मुख्यमंत्री जी देतील ती मी पूर्ण करणार आहे. कार्यकर्ते माझ्यासोबत पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाराज नाही झाले तर ते माझे बंधू असल्याने पारिवारिक सदस्य म्हणून नाराज झाले आहेत. माझ्यासाठी संघर्ष काही नवीन नाही, असंही गवळी यांनी बोलून दाखवलं.
