'तुम्ही म्हणाल ही जादू, पण...' गौतम वैष्णव जे करते ते पाहून व्हाल थक्क
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
प्रत्येक व्यक्तीकडे एखादी ना एखादी कला दडलेली असते. परंतु त्या कलेला योग्य दिशा, सातत्य आणि निसर्गाशी असलेले नाते मिळाले तर ती एक वेगळीच ओळख निर्माण करू शकते.
पुणे : प्रत्येक व्यक्तीकडे एखादी ना एखादी कला दडलेली असते. परंतु त्या कलेला योग्य दिशा, सातत्य आणि निसर्गाशी असलेले नाते मिळाले तर ती एक वेगळीच ओळख निर्माण करू शकते. पुण्यातील सहकारनगर परिसरात राहणारे गौतम वैष्णव हे असेच एक नाव. निसर्गाच्या सान्निध्यात दगडांच्या समतोलातून आकर्षक शिल्पनिर्मिती करणारी त्यांची रॉक बॅलन्सिंग ही कला आज देशभरात लोकप्रिय झाली आहे. या कलेला भारतात मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात गौतम यांचा मोठा वाटा असून, अनेकांना मानसिक स्थैर्याचा आणि निसर्गाशी बंध दृढ करण्याचा नवा मार्ग त्यांनी दाखवला आहे.
गौतम वैष्णव यांनी बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. सुरुवातीला ही अनोखी कला करताना त्यांना अनेकांकडून टोमणे ऐकावे लागले. दगडांत काय असतं? यात काय अर्थ आहे? असे प्रश्न त्यांच्यापुढे वारंवार येत. मात्र, जिद्द, सातत्य आणि कलेविषयी असलेली अतूट उत्सुकता यांच्या जोरावर त्यांनी ही कला केवळ आत्मसातच केली नाही, तर पुढे तिला मानाचा दर्जाही मिळवून दिला. आज गौतम जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर दगडांचा समतोल साधत एकापेक्षा एक कलाकृती सादर करतात, तेव्हा त्यांचे कौशल्य पाहून प्रेक्षक थक्क होतात. ते खोटं आहे! हे कसं शक्य आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो, आणि हाच प्रश्न गौतम यांच्या कलेची मोहिनी वाढवतो.
advertisement
2016 पासून त्यांनी रॉक बॅलन्सिंगला व्यावसायिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवर स्वीकारले. नियमित सराव, निसर्गाशी संवाद आणि मनःएकाग्रतेमुळे या कलेत ते अधिकाधिक प्रगल्भ होत गेले. विविध आर्ट एक्झिबिशन, परफॉर्मन्सेस आणि कार्यशाळांमधून ते आज हजारो लोकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी रॉक बॅलन्सिंग ध्यान, तणावमुक्ती आणि संयम साधण्याचे साधन म्हणून स्वीकारले आहे.
advertisement
या कलेमुळे मी स्वतःमध्ये संयम, शांतता आणि ऐकून घेण्याची क्षमता विकसित केली आहे, असे गौतम सांगतात. त्यांच्या मते, ही केवळ कलाकृती नसून निसर्गासोबत साधलेली एक आध्यात्मिक जोड आहे. दगडांच्या वजनाचे, आकाराचे आणि केंद्रबिंदूचे आकलन करत करत मनात निर्माण होणारी शांतता त्यांना आज या क्षेत्रात पुढे घेऊन जाते.
गौतम वैष्णव यांची रॉक बॅलन्सिंगचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परंपरेच्या पलीकडे जाऊन नवे मार्ग शोधण्याची आणि निसर्गातूनच कलाविष्कार उलगडण्याची क्षमता किती अद्भुत असू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 5:19 PM IST









