मित्रानेच केला विश्वासघात
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ५ जानेवारीच्या रात्री आपल्या एका ओळखीच्या मित्रावर विश्वास ठेवून घराबाहेर पडली होती. २१ वर्षीय सलमान खान याने तिला फिरवण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसवले. यावेळी त्याचा २४ वर्षीय मित्र 'सरदारजी' हा देखील कारमध्ये आधीपासूनच उपस्थित होता. या दोघांनी मुलीला कमी वर्दळीच्या निर्जन ठिकाणी नेले.
advertisement
भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून अत्याचार
आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत पीडित मुलीला आधी जबरदस्तीने भांगेच्या गोळ्या खाऊ घातल्या. मात्र मुलगी पूर्णपणे शुद्ध हरपली नसल्याचे पाहून त्यांनी तिला बळजबरीने मद्य पाजले. मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतर या दोन्ही नराधमांनी कारमध्येच तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अमानवी कृत्यानंतर पीडितेची प्रकृती खालावली होती.
दोन नराधमाच्या मुसक्या आवळल्या
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीने हिंमत एकवटून घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीवर ओढवलेला प्रसंग ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ मिरा रोड पोलीस ठाणे गाठले. मंगळवारी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय दंड संहिता आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो - POCSO) अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी बुधवारी दुपारी सलमान खान आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या.
कठोर कारवाईची मागणी
काही दिवसांपूर्वीच मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात एका महिला कर्मचाऱ्यावर अत्याचाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता एका अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात कारमध्ये झालेल्या या अत्याचारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.
