कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संगमनेरमधील वसंत लॉन्स इथं तीन दिवसांपूर्वी संपन्न झाला. अतिशय थाटामाटात झालेल्या सोहळ्याला राजकीय सामाजिक, वारकरी सांप्रदायातले अनेक जण उपस्थित होते. पण हा साखरपुडा काही साधा सुद्धा नव्हता. एसी हॉल, सोन्याचे दाग-दागिने अन् लग्नालाही लाजवेल असा शाही थाट होता. यावरून सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना टीकेला सामोरं जावं लागलं. पण, 'गेली २० वर्ष लोकांनी नाव ठेवली तेच सहन करत आलो, पण आता यावेळी मी चांगले बदल केले. साखरपुड्यात मी कुणाचाही सत्कार सोहळा केला नाही. या पुढे एकाही व्यक्तीचा सत्कार करायचा नाही, असं ठरवलं आणि तेच केलं. करायचा असेल तर सगळ्यांचा करायचा नाहीतर एकाचाही करायचं नाही असं ठरवलं होतं. हा साखरपुडा इतक्या मोठ्या पद्धतीने केला तो हेच दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. बदल करण्याचं ठरवलं तर आपण ते करू शकतो, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी ट्रोलकऱ्यांना उत्तर दिलं.
advertisement
तसंच, माझ्या लेकीच्या साखरपुड्यात महाराष्ट्रीयन जेवण ठेवलं. परदेशी, चायनीज नाही म्हणजे नाहीच ठेवलं. जेवण वाढणारे वाढकरी हे वारकऱ्यांच्या पोशाखात होते. सगळ्यांना समान वागणूक दिली. लेकीच्या साखरपुड्यात सगळे खाली बसले होते, जे आजारी आहे त्यांना खुर्चीवर बसवलं. वारकरी संप्रदायाने एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं. मी कधीच कुणाला कमी पाहिलं नाही, कुणाची स्तुती केली नाही आणि निंदाही केली नाही' असंही इंदुरीकर महाराजांनी आवर्जून सांगितलं.
