सोमवारी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटण्यासाठी आले होते, असा दावा मनोज जरांगे यांनी केला होता. मला भेटण्यासाठी आल्यानंतर मला सांभाळा असे म्हणाले होते. हे दोघेही जण रात्रीच्या वेळी आले होते. मला या दोघांना भेटण्याची इच्छा नव्हती. मात्र, ते बराच वेळ बाहेर थांबले होते. त्यामुळे त्यांना भेटलो असल्याचे जरांगे यांनी म्हटले.
advertisement
धनंजय मुंडेंना मदत केली? जरांगे पाटलांनी काय म्हटले?
धनंजय मुंडे याला मोठे व्हायला मराठे लागतात हे तेच मान्य करतात. ते मला रात्री भेटले आल्यावर काय घडले, जाताना त्यांनी काय कृती केली हे आता सांगू शकत नाही नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी माझे गणित जमले नाही म्हणून मी राज्यात कुठेच गेलो नाही. त्यामुळे परळीमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
तर, फडणवीस आणि पवार जबाबदार...
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली. मुंडेंनी मंत्रीपदावरून राहून पुरावे नष्ट केले आणि संतोष देशमुख खून आणि खंडणी प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर आम्ही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरू अशी संतापजनक प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.
त्यांना हाणायला पाहिजे...
वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री वास्तव्यास जात नाही यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वर्षा बंगल्यात काळी जादू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. अनेक लोक आत्महत्या करीत आहेत आणि हे लिंबू मिरचीवर चर्चा करीत आहेत. त्यांना उघडे करून हाणायला पाहिजे अशी जहरी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
