नेमकी घटना काय?
रोहित समाधान पवार (वय १८) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. रोहित जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता आणि तो सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहत होता. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी रोहितचे वडील त्याला भेटून गेले होते. वडिलांच्या भेटीनंतर काही तासांतच रोहितने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
advertisement
घटनेच्या वेळी रोहित रूममध्ये एकटाच होता. त्याचा रूममेट परत आला असता, वारंवार हाक मारूनही रोहितने दरवाजा उघडला नाही. संशय आल्याने वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
इन्स्टाग्रामवरील 'तो' अखेरचा मेसेज
आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटस ठेवले होते. त्यामध्ये त्याने आपले सोशल मीडिया अकाउंट बंद करत असल्याचं म्हटलं होतं. रोहितनं आपल्या मेसेजमध्ये लिहिलं की, "इन्स्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्यामुळे आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये. कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर मला माफ करा."
हा मेसेज टाकल्यानंतर काही वेळातच त्याने आत्महत्या केली. या मेसेजमुळे त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं आणि त्याला कोणत्या समस्येचा सामना करावा लागत होता, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितने असं अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याचा शोध पोलीस घेत आहेत.
