जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती आघाडीवर आहे. प्रभाग प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिंदे सेनेने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे 18 ब मधील उमेदवार सोनवणे नलुबाई तुळशीदास यांनी ठाकरे गटाच्या तापीबाई रंजीत राठोड यांना चित पट केले आहे. तर 18 क मधून शिवसेनेच्या अनिता सुरेश भापसे यांनी ठाकरे गटाच्या सोनम रोहिदास सोनवणे यांना चित पट केले आहे. शिंदे सेनेचे यापूर्वीच 18 अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे बिनविरोध विजयी झालेले आहेत. त्यातच आता प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले आहे
advertisement
खान्देशातील सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १९ प्रभागांमध्ये मतदान घेण्यात आले होते. या मतदानानंतर आता मतमोजणी पार पडते आहे.
12 उमेदवार बिनविरोध विजयी
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६ उमेदवार आहेत. गुरुवारी (१ जानेवारी) भाजपचा एक आणि शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या संख्येत वाढ झाली.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
भाजपकडून उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, विशाल भोळे, विरेन खडके, अंकिता पंकज पाटील आणि वैशाली अमित पाटील हे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.तर शिवसेना (शिंदे गट) कडून गौरव सोनवणे, सागर सोनवणे, गणेश सोनवणे, रेखा पाटील, मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष
या बिनविरोध विजयांमुळे महायुतीला निवडणुकीपूर्वीच मोठे बळ मिळाले आहे. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये होणाऱ्या थेट लढतींमुळे निवडणुकीचे अंतिम चित्र काय असेल, याबाबत उत्सुकता कायम आहे. जळगाव महानगरपालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, महायुती आपले वर्चस्व कायम ठेवणार की विरोधक धक्का देणार, याकडे आता संपूर्ण खान्देशाचे लक्ष लागले आहे.
महायुतीची जागावाटपाची रणनीती
जळगावमध्ये महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत भाजपला ४६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ६ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) यांना २३ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र या जागावाटपात काही प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात उमेदवारांची आयात-निर्यात झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, ती दूर करण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
