अनिल गोविंदा संदानशिव (रा. सुमठाणे, पारोळा) असे या नराधम सिरीयल किलरचे नाव आहे. महिलांशी प्रेमाचे नाटक रचून, त्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करायचा आणि त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह निर्दयपणे जंगलात फेकून द्यायचा. त्याने शोभाबाई कोळी आणि वैजयंताबाई भोई या दोन महिलांचा खून केल्याची कबुली दिली असून, शाहनाज बी या तिसऱ्या महिलेवरील त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत.
advertisement
अनिल संदानशिवचे शब्द गोड होते, वागणं सोज्वळ होतं. कोणत्याही महिलेचं मन जिंकण्याचं खास टॅलेंट त्याच्याकडे होतं. त्यामुळे महिला त्याच्या गोड बोलण्याला भुलून त्याच्या प्रेमात पडायच्या. पण जेव्हा विश्वास पूर्णपणे बसला जायचा, तेव्हा सुरू व्हायचा त्याचा खरा आणि भयावह प्लॅन. जळगाव जिल्ह्यातला या 'लेडी सिरीयल किलर'ची अनेकांवर नजर होती. त्याने अशाच पद्धतीने शोभाबाई कोळी आणि वैजयंताबाई भोई यांना गोड बोलून फसवलं होतं.
वैजयंताबाई भोईंसोबत 'सुरत'पासून मृत्यूच्या प्रवासाला सुरुवात!
या खुनांपैकी एक अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, वैजयंताबाई भोई (रा. सुरत, मूळ गाव फरकांडे, एरंडोल तालुका) यांची अनिल संदानशिव याच्याशी सुरत येथे ओळख झाली होती. सुरत येथे अनिल काही काळ वास्तव्यास होता आणि तेथे काम करत असताना त्याची वैजयंताबाई यांच्याशी जवळीक वाढली. गोड गप्पा, प्रेमाचे नाटक आणि विश्वास संपादन करत अनिलने वैजयंताबाई यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघे एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यात परतले. वैजयंताबाईंना वाटले की, याचं खरं प्रेम आहे, पण हाच प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.
२ मे रोजी त्या आपल्या मूळगावी परत आल्या आणि काही दिवसांतच अनिलने त्यांना सुमठाणे शिवारातील जंगलात नेले. तिथे तिचा निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिला. २३ जुलै रोजी पोलिसांना तिचे आधारकार्ड, चप्पल, हाडांचे अवशेष मिळाले आणि तिची ओळख पटली.
दुसरा खून - शोभाबाई कोळी!
२५ जून रोजी सुमठाणे शिवारात जंगलात शोभाबाई रघुनाथ कोळी (रा. उंदीरखेडा, ता. पारोळा) यांचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. मृतदेह गोणीमध्ये ठेवून फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अनिल संदानशिव याला अटक करण्यात आली.
तिसरी बचावलेली महिला - शाहनाज बी!
अनिल संदानशिव याने शाहनाज बी यांनाही त्याच जंगलात गोड बोलून बोलावले होते. तिथे डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला, मात्र शाहनाज यांनी जोरदार आरडाओरड केल्याने काही लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि अनिल घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या.
खून करण्याची ठरलेली 'शैली' आणि ठिकाण!
अनिल संदानशिव बसमध्ये, गावात, कामाच्या ठिकाणी महिलांशी गोड बोलून ओळख वाढवायचा. त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायचा. त्यानंतर विश्वास संपादन करून सुमठाणे शिवारातील सामाजिक वनीकरणाच्या जंगलात नेऊन, डोक्यात दगड घालून खून करायचा. खून करण्याआधी तो त्यांच्याकडील दागिने, पैसे लुटायचा. अनिल संदानशिव या सिरीयल किलरच्या या पाशवी कृत्यांमुळे जळगाव जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.