पाचोरा पोलिसांना एका गुप्त माहितीदाराच्या आधारे सोहेल शेख तय्यूब शेख या तरूणाने धारदार तलवारी बाळगल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पाचोरा येथील माहिजी नाका परिसरातून सोहेल शेख तय्यूब शेख याला ताब्यात घेतलं होतं. यावेळी सोहेलची चौकशी केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकत एकूण 20 तलवारी जप्त केल्या आहेत. या तलावारीची एकूण किंमत 54 हजार रूपये आहे.
advertisement
या प्रकरणात अजून कसून तपास केला असता सोहेलने काही तलवारी आधीच विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते.त्यामुळे विनापरवाना अवैधरीत्या शस्त्रांचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने तलवारी आणणाऱ्या सोहेल शेख विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.
तसेच या प्रकरणात आरोपी या तलवारी नेमक्या कुठून आणायचा. तसेच जप्त केलेल्या तलवारी नेमक्या कुणाला विकण्याचा त्याचा कट होता. यामागे कोणता घातपाताचा कट तर नाही असा संशय देखील उपस्थित होत आहे.त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाला सूरूवात केली आहे. तसेच या घटनेने जळगामध्ये खळबळ माजली आहे.
तरूणावर प्राणघातक हल्ला
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हर्षल कुणाल पाटील असं हल्ला झालेल्या जखमी तरुणाचं नाव आहे. ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्याच्यावर चॉपर आणि कोयत्याने हल्ला केला. यात हर्षल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या जिल्हा शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
हा हल्ला रविवारी रात्री रामेश्वर कॉलनीतील राज विद्यालयासमोर घडला. हर्षल हा त्याचा मित्र नितीन देशमुखसोबत बोलत बसला होता, त्याचवेळी दोन दुचाकींवरून ८ ते १० जण तिथे आले. त्यांनी हर्षलला 'तू आमच्या जुन्या वादात सहभागी होता' असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आतच एका आरोपीनं हर्षलच्या मानेवर आणि डोक्यावर चॉपरने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हर्षल जमिनीवर कोसळला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.हर्षलचा मित्र नितीन देशमुख याने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. याचा फायदा घेत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.