गेल्या काही दिवसांपासून पाचोरा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे जुन्या मातीच्या घरांची पडझड सूरू आहे. त्यातच आज पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचे छत कोसळून दोन मुले ढिगाऱ्याखाली दाबली गेल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत महेश पाटील (वय 12)या मुलाचा मृत्यू झाला असून योगेश चव्हाण (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेच माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर प्रशासनानेही मदतीसाठी यंत्रणा तैनात केली होती.
advertisement
विद्युत दुरुस्तीचे काम करताना एकाचा मृत्यू
दरम्यान या घटनेआधी काही दिवसांपूर्वी जळगावच्या धरणगाव महावितरण कार्यालयात 'झिरो वायरमन' म्हणून ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या दिलीप देवा भिल याचा कामादरम्यान इलेक्ट्रिक खांबावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिलीप भील हा धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरात नेहमीप्रमाणे विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना हा अपघात घडला. नेमका शॉक लागून की तोल जावून पडला,हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिलीपला सहकाऱ्यांनी तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दिलीप हा गेल्या 10 वर्षांपासून झिरो वायरमन म्हणून काम करत होता आणि तो गारखेडा येथे कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शोकाकुल आई-वडीलांचा आक्रोश उपस्थितांना भावुक करणारा होता. दिलीप हा कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य होता. त्यामुळे एकलव्य संघटनेने या प्रकरणी महावितरणकडून आर्थिक मदतीची ठोस मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास दिलीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.