भुसावळ, 13 ऑगस्ट : गेल्या काही वर्षात वाहन चोरींच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. या विशेष करुन दुचाकींना जास्त लक्ष्य केलं जात आहे. शहरी भागात वाढत्या दुचाकी चोरींमुळे वाहनचालकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच नाही तर दिवसाढवळ्या चोर हाथ साफ करत असल्याने पोलीस प्रशासनासमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. अनेकदा या दुचाकींचा गैरवापर होतो. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीत मूळ मालकही गोत्यात येतो. दरम्यान, अशीच एक घटना भुसावळ येथे घडली आहे. गाडी चोरताना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
भुसावळ शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील मन्यार हॉलजवळ रात्री चोरट्यांनी मोटरसायकल चोरून नेली आहे. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भुसावळ शहरामध्ये अनेक दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गस्ती वाढवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चोरटा चोर पावलांनी येत हळून गाडी स्टँडवरुन काढून ढकलत दूर नेताना दिसत आहे.
या जिल्ह्यातील दुचाकीची विक्री शेजारच्या जिल्ह्यात
जळगाव शहरातून चोरलेली दुचाकी धुळ्यात, नंदुरबार येथून चोरलेली जळगावात विक्री करून अनेक वर्षांपासून गुंगारा देणारा अट्टल गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांच्या हाती लागला आहे. जळगाव शहरात चोरीची दुचाकी विक्री करताना भामट्याला अटक केली. त्याने 11 दुचाकी काढून दिल्या. गोपाळ भाईदास शिरसाठ (वय 23, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर जि. धुळे, ह.मु. बेस्तान, जि. सुरत) असे चोरट्याचे नाव आहे.
दुचाकी चोरटा गोपाळ भाईदास शिरसाठ मास्टर चावीने दुचाकींची चोरी करुन त्याची विक्री दुसऱ्या जिल्ह्यात करीत होता. गोपाळ शिरसाठ अजिंठा चौफुली परिसरात दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून पोलिसांनी गोपाळ शिरसाठ याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आपण जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या ११ विनाक्रमांकाच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
