जालना : विठू नामाच्या जयघोषात संत मुक्ताईंची पालखी जालन्याहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तब्बल 315 वर्षांची परंपरा असलेली ही पालखी जालना शहरांमध्ये दरवर्षी मुक्कामी थांबते. गुरुवारी शहरातील कन्हैया नगर येथील मंदिरात पालखीचा मुक्काम होता. यानंतर आज शुक्रवारी ही पालखी काजळा फाटा येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.
येत्या 14 जुलैपर्यंत ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तब्बल 60 ते 65 दिवसांचा हा प्रवास वारकरी पायी पार करत आहेत. संत मुक्ताईच्या पालखीची परंपरा नेमकी किती वर्षांची आहे आणि वारकरी परंपरेत या पालखी सोहळ्याचं काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
आदिशक्ती मुक्ताईंचा पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि खूप मोठा सोहळा आहे. 18 जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून समाधी स्थळावरून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. आज हा सोहळा जालना जिल्ह्यामध्ये स्थित झाला आहे. या पालखी सोहळ्याला तब्बल 315 वर्षांची परंपरा आहे. या पालखी सोहळ्याच्या पुढे आणि मागे तब्बल 125 ते 130 दिंड्या असतात. तब्बल 6 जिल्ह्यातून प्रवास करून 14 जुलै रोजी हा सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव! तुकोबांच्या पालखीसाठी देहूत वैष्णवांचा मेळा
पंढरपूरला गेल्यानंतर प्रदक्षिणा घालून गोपाळपूरला काला केल्यानंतर ही दिंडी माघारी फिरते. श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर असा पुन्हा एकदा 600 किमींचा प्रवास ही पायी दिंडी करते. म्हणजे एकूण 1200 किमींचा प्रवास दिंडीतील वारकरी करतात. एकूण 60 ते 65 दिवसांचा हा प्रवास वारकरी आनंदाने पार करतात. तब्बल 315 वर्षांपासूनची ही परंपरा अविरत कायम असल्याचे आदिशक्ती मुक्ताई पालखीची प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितलं.
Wari 2024: पालखी सोहळ्यासाठी 'या' दिवशी दिवेघाट पूर्णपणे बंद
वारकऱ्यांनी व्यक्त केल्या या भावना -
मी मध्यप्रदेश येथून आहे. मुक्ताई वारीचे, हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि या वारीत आल्यानंतर खूप छान वाटत आहे. वातावरण एकदम भारावल्यासारखं आहे आणि वारीचा हा माझा पहिलाच अनुभव असल्याने अतिशय सुंदर भावना आहेत, असं वारकरी सुप्रिया महाजन यांनी सांगितलं. आदिशक्ती मुक्ताई या मातृशक्तीचे प्रतिक असल्याने या वारीमध्ये महिलांची संख्या ही विशेषत्वाने अधिक असते.
स्वच्छ निर्मल वारी अभियान अंतर्गत राज्य शासनाकडून स्वच्छतेसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, आरोग्यासाठी लागणारे डॉक्टरांचे पथक, आणि वाहतुकीची व्यवस्था इत्यादी बाबी पुरवण्यात आल्याचे रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले.