जालना : निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली होती. या योजनेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे. मात्र, ज्या महिलांनी 31 जुलैपर्यंत या योजनेसाठी फॉर्म भरले आहेत व त्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेची पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
काल 14 ऑगस्ट रोजी अनेक महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले आहेत. जालना शहरातील देखील अनेक महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आहेत. यामुळे महिला आनंदी आहेत. जालना शहरातील महिलांना खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सकाळी आठ वाजता मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्याचा संदेश आला. माझ्या खात्यावर 3 हजार रुपये जमा झाले आहेत. यातील 500 रुपये मी महादेवाच्या भंडाऱ्याला देणार आहे. कारण पहिलाच हप्ता जमा झाल्याने मी असे करणार आहे. यानंतर बाकी उरलेले पैसे हे मुलांच्या शिक्षणासाठी, घरात किराणा सामान आणण्यासाठी व इतर गृह उपयोगी वस्तूंसाठी उपयोगी येतील, असे लाभार्थी रूपाली वाघमारे यांनी सांगितले.
इतक्या लवकर पैसे येतील असे वाटले नव्हते -
लाडकी बहीण योजनेचे पैसे माझ्या खात्यात जमा झाले आहेत. सकाळी 10 वाजता मला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेज बघून मला खूप आनंद झाला. एवढ्या लवकर हे पैसे खात्यामध्ये जमा होतील, असे वाटले नव्हते. पण ते पैसे आल्याने आता आम्हाला काहीतरी लाभ होईल. माझ्या मुलांना या योजनेचा लाभ होईल. भविष्यातही योजना अशी सुरू राहावी, अशी अपेक्षा वर्षा करपे यांनी व्यक्त केली.
आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांचे आभार -
आज सकाळी 11 वाजता 3000 रुपये जमा झाले आहेत. ही योजना छान आहे. घरगुती कामासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी भरपूर उपयोग होणार आहे. आमच्या येथील अंगणवाडी सेविका यांनी आम्हा महिलांचे फॉर्म व्यवस्थित भरले आणि त्यामुळेच आमच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा झाले. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांचीही मी खूप आभार मानते, अशी भावना पुनम वाघमारे यांनी व्यक्त केली.