ताराचंद खुशालचंद झाडीवाले यांच्या फळपीक विमा व विविध योजनांचे पैसे भलतेच लोक उचलत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी झाडीवाले यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बोगस कामे करणाऱ्या व्यक्तींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या येत असल्याने त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
advertisement
तहसीलदाराच्या टेबलावर पैशाचा पाऊस, शेतकऱ्याच्या ‘त्या’ कृतीने खळबळ, जालन्यात काय घडलं? Video
ताराचंद खुशालचंद झाडीवाले यांची बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील गट नंबर 672 येथे 8 एकर जमीन आहे. झाडीवाले हे फेब्रुवारी 2024 मध्ये फळपीक विमा भरण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा विमा भलत्याच व्यक्तीने भरल्याचे समजले. यानंतर पीक विम्याचे पैसे खात्यावर पडण्यास सुरुवात झाल्यानंतर झाडीवाले यांनी याबाबत कृषी विभागात चौकशी केल्यानंतर विम्याचे पैसे कुणीतरी उचलल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी बदनापूर तालुक्यातील अकोला येथील एका महिलेच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाल्याचा आरोप झाडीवाले यांनी फिर्यादीत केला आहे.
“माझ्या शेतीचा फळपीक विमा भलत्याच लोकांनी उचलला आहे. यामुळे माझे सुमारे 3 लाख 60 हजारांचे नुकसान झाले आहे. मागील 2023 पासून हा प्रकार सुरू आहे. मी गुन्हा दाखल केल्यापासून धमक्या येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी. कारवाई झाली नाही तर मी उपोषण करणार आहे. याचीही प्रशासनाने दखल घ्यावी,” अशी मागणी ताराचंद झाडीवाले यांनी केली आहे.
दरम्यान, ताराचंद झाडीवाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. बदनापूरसह जिल्ह्यात बोगस पीक विमा भरून पैसे उचलणारी टोळी सक्रिय आहे. बोगस कागदपत्रे बनवून अनेकांच्या पीक विम्याचे पैसे या टोळीने हडप केल्याचा आरोप झाडीवाले यांनी केला.






