मी आज नांदेड ते मुंबई या वंदे भारत ट्रेनचा नांदेड येथून मुंबईपर्यंतचा प्रवास करत आहे. या ट्रेनमध्ये बसून खूप छान वाटते. विमानामध्ये बसल्यासारखा अनुभव आहे, असं मुंबई येथील प्रवासी परिणय मगरे यांनी सांगितलं.
वंदे भारत ट्रेन सुरू झाल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. नांदेडकरांची ही खूप दिवसांची मागणी होती. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे शिक्षणाचे, आरोग्याचे किंवा इतर कारणांसाठी मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे जाणं सोयीचे होणार असल्याचं नांदेड येथील एका प्रवाशाने सांगितलं.
advertisement
ट्रेनमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत. आम्हाला तर विमानात बसल्यासारखाच अनुभव येत आहे. ज्यांनी ज्यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचे आभार. त्यांनी नांदेडकरांसाठी या पद्धतीची सुपरफास्ट ट्रेन सुरू केली, अशी भावना राकेश सोळंके यांनी व्यक्त केली.
ही आहेत ट्रेनची वैशिष्ट्ये
नांदेड ते मुंबई हे 610 किमी अंतर 9 तास 30 मिनिटांत कापता येणार
एसी चेअर कार तिकीट 1610
तर एक्सिक्युटीव्ह चेअर कार तिकीट 2930 रुपयांना
ट्रेनला असतील एकूण 20 कोच
1440 प्रवासी करू शकतील प्रवास
दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड असे असतील थांबे.
27 ऑगस्टपासून ही वंदे भारत एक्सप्रेस नियमित सुरू होत आहे. सकाळी पाच वाजता ही ट्रेन नांदेड येथून निघणार असून परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई असे थांबे असणार आहेत. तर मुंबईवरून एक वाजून दहा मिनिटांनी ही ट्रेन निघणार असून नांदेड येथे दहा वाजेच्या सुमारास पोहोचणार आहे. बुधवारी नांदेड येथून तर गुरुवारी मुंबई येथून ही ट्रेन नसणार आहे. मराठवाड्यातील विशेषतः परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही ट्रेन प्रवासाचा एक सुखद अनुभव ठरणार आहे.