कल्याण: निवडणूक म्हटली की डोळ्यासमोर पाण्याचा सारखा खर्च होणारा पैसा, बड्या गाड्यांचा ताफा आणि कोट्यवधींची उधळपट्टी येते. कार्यकर्त्यांची निवडणूक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोट्यधीश उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतही अशाच प्रकारे अनेक धनदांडग्या उमेदवारांनी नशीब आजमावले. मात्र, या सर्वांच्या गर्दीत कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक १६अ मधील एका निकालाने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणतीही भक्कम आर्थिक परिस्थिती नसताना, केवळ जनशक्तीच्या जोरावर निलेश खंबायत यांनी मिळवलेला विजय हा 'लोकशाहीचा विजय' मानला जात आहे.
advertisement
लोकांसाठी लढायचं म्हणून लोकांनीच दिली साथ निलेश खंबायत हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी खंबायत यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. खंबायत यांची जनसंपर्क दांडगा असला तरी, निवडणूक लढवण्यासाठी लागणारी लाखोंची रसद त्यांच्याकडे नव्हती. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा गंभीर विचार केला होता.
> मित्रांनी आणि मतदारांनी सावरली बाजू
खंबायत यांनी जेव्हा आपली आर्थिक हतबलता मित्रांना बोलून दाखवली, तेव्हा कोणालाही अपेक्षित नसलेली गोष्ट घडली. "पैशाअभावी तू माघार घेऊ नकोस, तुझ्या प्रचाराचा खर्च आम्ही करू," असा शब्द प्रभागातील शेकडो नागरिकांनी त्यांना दिला. बघता बघता मदतीचे हात पुढे आले आणि मतदारांनीच वर्गणी जमा करून ५० हजार रुपये गोळा केले. या रकमेतून प्रचाराचे प्राथमिक साहित्य खरेदी करण्यात आले. विशेष म्हणजे, मतदारांनी केवळ पैसेच दिले नाहीत, तर स्वतःच्या घराप्रमाणे या निवडणुकीचा प्रचारही केला.
> अटीतटीची लढत आणि रोमांचक विजय
मतदानाच्या दिवशी ११ हजार ७९७ मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक फेरीत धाकधूक वाढत होती. अखेर जो निकाल समोर आला तो थक्क करणारा होता. निलेश खंबायत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार श्वेता जाधव यांचा अवघ्या ६ मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर परिसरात एकच जल्लोष करण्यात आला.
"हा विजय माझा नसून, ज्या मतदारांनी स्वतःचे पैसे खर्च करून माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचा हा विजय आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया खंबायत यांनी विजयानंतर दिली. राजकारणात पैसाच सर्वकाही नसतो, तर प्रामाणिक माणूस आणि जनतेची साथ असेल तर विजय निश्चित असतो, हेच खंबायत यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
