आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने दीड महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जिम मालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेत राहणारी ही तरुणी नियमितपणे शहरातील एका जिममध्ये व्यायामासाठी जात होती. याच दरम्यान, तिची ओळख जिम मालकाशी झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत जिम मालकाने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले आणि तिच्यावर अनेकदा अत्याचार केले.
advertisement
कालांतराने, आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने दीड महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी जिम मालक तत्काळ शहरातून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अखेरीस, सोमवारी आरोपी कल्याणमधील फडके मैदान भागात फिरत असल्याची गुप्त माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि आरोपीला अटक केली.
अटक केल्यानंतर आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या आरोपीने अशाप्रकारे इतर कोणत्याही महिलांना फसविले आहे का, किंवा आणखी कोणावर अत्याचार केले आहेत का, या दृष्टीने सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे कल्याणमधील जिममध्ये जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
