खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील रहिवासी असलेली ही तरुणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी शहरातील एका प्रसिद्ध जिममध्ये व्यायामासाठी जात होती. याच दरम्यान, तिची ओळख त्या जिमच्या मालकासोबत झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि याचा गैरफायदा घेत जिम मालकाने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं.
लग्नाचं आमिष दाखवून त्याने तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केले. कालांतराने, या अत्याचाराचं प्रमाण वाढलं, शिवाय आरोपीने दिलेल्या धमक्यांमुळे तरुणी मानसिकदृष्ट्या खचून गेली. हे सर्व प्रकार असह्य झाल्याने अखेर पीडित तरुणीने सुमारे दीड महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
advertisement
आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचं समजताच आरोपी तत्काळ शहरातून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. सोमवारी आरोपी कल्याणमधील फडके मैदान भागात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
अटक केल्यानंतर आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या आरोपीने इतर कोणत्याही महिलांवर अशाप्रकारे अत्याचार केले आहेत का, या दृष्टीने कसून तपास करत आहेत.
