पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात १० डिसेंबर २०२५ रोजी शिर्डी राहणाऱ्या सचिन गिधे नावाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं. सचिन गिधे हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार दिपक पोकळे, प्रवीण वाघमारे आणि त्यांच्या साथीरांच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
advertisement
नेमकं काय घडलं?
10 डिसेंबर 2025 रोजी शिर्डीच्या हॉलीडे पार्क परिसरात राहणाऱ्या मयत सचिन कल्याणराव गिधे हा तरुण साई सुनिता हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी प्रवीण वाघमारे याने सचिनच्या बायकोला फोन करून 'तुझा नवरा माजला आहे, त्याचे हातपाय तोडावे लागतील' अशी धमकी दिली होती. त्यानंतर सचिन गिधे हा बेपत्ता झाला होता. १५ डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. मागील २० दिवसांपासून पोलिसांना सचिन गिधे कुठे असेल याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान होतं.
पण, ज्या दिवशी सचिन गिधेचं अपहरण झालं होतं, त्याच दिवशी याच आरोपींनी गौतम निकाळे नावाच्या तरुणाला साकुरी शिवरामध्ये दगडाने ठेचून पाय फ्रॅक्चर केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणी प्रवीण ऊर्फ पन्नास वाघमारे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं. या पथकाने तपास सुरू केला असता आरोपी आणि त्याचे साथीदार हे संगमनेरमधील मेंढवण शिवारातील लपून बसले असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी संगमनेरमधील मेंढवण शिवाराला घेराव घातला आणि मुख्य आरोपी दीपक पोकळे आणि दरेकर याना बेड्या ठोकल्या. अंबादास पोकळे हा रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. तो वारंवार आपलं ठिकाण बदलत होता. पुणे, नाशिक, खारघर आणि छत्रपती संभाजीनगर, मालेगाव अशा पाच ठिकाणी पोलिसांनी त्याचा माग काढला होता. शेवटी ६ जानेवारी २०२६ रोजी दीपक पोकळे हा त्याचा साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर याच्यासह संगमनेरमधील मेंढवण शिवारात लपले होते, तिथे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून हत्या
आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस चौकशी सुरू केली असता दीपक पोकळेनं हत्येची कबुली दिली. अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून सचिन गिधे याची हत्या केली होती. दीपक पोकळे, गणेश दरेकर, प्रवीण वाघमारे आणि कृष्णा वाघमारे या चौघांनी मिळून सचिन गिधेचा निर्घृणपणे खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी सचिनच्या मृतदेहावर टायर टाकले आणि डिझेल ओतून प्रेत जाळून टाकलं. या खुनासाठी त्यांनी विना नंबर प्लेटची १५ लाख किंमतीची स्कॉर्पिओ गाडी वापरली होती, पोलिसांनी ती जप्त केली आहे.
दीपक पोकळेवर १७ गुन्हे
आरोपी दीपक पोकळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि जबरी चोरी यासारखे तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिर्डी, राहता आणि कोपरगाव परिसरात त्याची दहशत होती. ही दहशत मोडीत काढत स्थानिक गुन्हे शाखेनं दीपक पोकळे या गुंडाला अखेर बेड्या ठोकल्या आहे. या हत्येचा पुढील तपास राहाता पोलीस करत असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
