कोल्हापूर: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि महायुती यांच्यातील या प्रतिष्ठेच्या लढाईत अखेर महायुतीने बाजी मारली आहे. एकूण 81 जागांपैकी महायुतीने 45 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे, तर काँग्रेसला 34 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
advertisement
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. इचलकरंजी, पुणे, नाशिक आणि नागपूरनंतर आता कोल्हापुरातही महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापूरसारख्या काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शहरात भाजपने केलेली ही कामगिरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
कोल्हापूरचा अंतिम निकाल
काँग्रेस- 34
शिवसेना- उबाठा - 1
महायुती - 45
भाजप - 26
शिवसेना - 15
राष्ट्रवादी - 4
जनसुराज्य - 1
अंतिम निकालानुसार काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 34 जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमताचा आकडा गाठता न आल्याने काँग्रेस सत्तेबाहेर राहणार आहे. काँग्रेसने अनेक प्रभागांत जोरदार लढत दिली. मात्र महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित ताकदीपुढे काँग्रेसची आघाडी कमी पडली.
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. जनसुराज्य शक्तीला देखील 1 जागा मिळाली असून, या दोन्ही पक्षांची भूमिका संख्याबळाच्या दृष्टीने मर्यादित राहणार आहे.
या निवडणुकीत पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, गटारी आणि नागरी मूलभूत सुविधांचे प्रश्न केंद्रस्थानी होते. प्रचारादरम्यान स्थानिक नेतृत्व, पारंपरिक भावकी-गावकीचे राजकारण आणि विकासकामांवर भर देण्यात आला.
