राजारामपुरीत तणावाचे वातावरण
आज सकाळी राजारामपुरीतील गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी नागरिकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने नागरिक संतापले होते. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात मोठी वादावादी झाली. "आम्ही घरची कामे सोडून इथे रांगेत उभे आहोत, पण गॅस कधी मिळणार याची शाश्वती कोणीच देत नाही," अशा संतप्त प्रतिक्रिया गृहिणींनी व्यक्त केल्या. अनेक ठिकाणी वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले असून, परिस्थिती हाताळताना कर्मचाऱ्यांची मोठी ओढाताण झाली.
advertisement
युद्धाची झळ थेट किचनपर्यंत
मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलासह गॅसच्या किमतीत आणि पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भारताची इंधन आणि गॅसची गरज मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने, आखातातील तणावाचा परिणाम स्थानिक वितरणावर होताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गॅसचा पुरवठा काही प्रमाणात मंदावला असून, ज्यांच्याकडे एकच सिलिंडर आहे अशा कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे.
प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
दुसरीकडे, गॅस वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, डिपोमधून गॅसचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. युद्धामुळे पुरवठा साखळीत खंड पडल्याने सिलिंडर वेळेवर पोहोचत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. ऐन महागाईच्या काळात आता गॅससाठीही तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने सर्वसामान्य कोल्हापूरकरांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
