कोल्हापूर : कोल्हापुरात पावसाचा जोर कायम राहिल्यानंतर सध्या पंचगंगा नदीचे पाजी धोका पातळीच्या वर वाहत आहे. त्यातच राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळेच कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला असून पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या चिखली आणि आंबेवाडी येथील सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. तर जे नागरिक स्थलांतरित होणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांचे सुरक्षितस्थळी पूरग्रस्त भागातील नागरिकांना हलविण्याचे काम सध्या सुरू आहे.
advertisement
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील चिखली आणि आंबेवाडी ही गावे पंचगंगेच्या पुरामध्ये सर्वाधिक बाधित गावे आहेत. 2019 आणि 2021 च्या महापुरात येथील नागरिकांची अख्खीच्या अख्खी घरे बुडाली होती. त्या अनुषंगाने काळजी घेऊन तेथील नागरिकांना स्थलांतर करण्याचा सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्यायी जागेत ज्यांनी घरे बांधली होती तिथे नागरिक जाऊ लागले होते. काहीजण आपल्या नातेवाईकांच्या घरी जातात. अशाच बाकीच्या सर्वांचे स्थलांतर एनडीआरडीएफ टीम आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.
जुन्या कटू आठवणी ताज्या -
चिखली आणि आंबेवाडी गावातील बऱ्याच नागरिकांनी स्वतःहुन स्थलांतर केले आहे. 2019 आणि 2021 च्या कटू आठवणी आजही कितीतरी जणांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्यामुळेच प्रशासनाकडून सूचना मिळताच स्थलांतर केल्याचे चिखली येथील नागरिक स्थलांतर करुन निवारा केंद्राच्या ठिकाणी गेले आहेत. यंदा 2021 प्रमाणे पूर परिस्थिती येऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जे स्थलांतरित होणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे -
पाण्याची पातळी ही निरंतर वाढत आहे. काल जिथे पाणी नव्हते तिथे रस्त्यावर देखील आता पाणी आले आहे. राधानगरी धरणाच्या पाण्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी वाढत राहणार आहे. त्यामुळे गावपातळीवर सर्वांना सूचना देऊन स्थलांतर करायला सांगितले आहे. मात्र, जे स्थलांतरीत होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करून, गुन्हे दाखल करुन त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. पण नागरिकांनी ही परिस्थिती येऊ न देता नागरिकांनी स्वतः स्थलांतरित होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करवीरचे प्रांत अधिकारी हरिष धार्मिक यांनी केले आहे.
एनडीआरएफ आहे सज्ज -
पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वतःच्या सामनासह जिल्हा प्रशासनाच्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित होणे आवश्यक आहे. 32 जवानांची एक एनडीआरएफची टीम कोल्हापुरात मागच्या 15 जूनपासून आहे. गरज पडल्यास नागरिकांना रेस्क्यु करण्याची सर्व साधने टीमकडे आहेत. जरी महापुराची परीस्थिती निर्माण झाली तरी नागरिकांनी एनडीआरएफची टीम तैनात असल्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, असे एनडीआरएफ टीम कमांडर ब्रिजेश कुमार यांनी सांगितले आहे.
राधानगरी धरणाचा 5 वा दरवाजा देखील उघडला -
दरम्यान 25 जुलै रोजी दुपारी 12 पर्यंत एकूण 4 दरवाजे उघडले आहेत. तर सायंकाळी 4.30 वाजता राधानगरी धरणाचा 7 नंबरचा अजून एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यामुळे सध्या धरणाची एकूण पाच 3, 4, 5, 6 आणि 7 नंबरचे दरवाजे उघडलेले आहेत. यांच्यातून 5 स्वयंचलित दरवाजांमधून प्रत्येक 1428 मिळून 7140 क्यूसेक्स आणि BOT पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक असा एकूण 8640 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





