कोल्हापुरातील व्हिडीओनंतर मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडीओत एक मांत्रिक अघोरी पूजा करताना दिसत आहे. स्मशानाज जाऊन भूत काढताना दिसत आहे. तसेच करणी करतानाही दिसला होता. त्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. दरम्यान कोल्हापुरातील चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकला.या छाप्यात अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत.
कोल्हापुरातल्या उपनगरात या चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाचा दरबार सुरू होता. अनेक नागरिकांची फसवणूक केल्याने भोंदू बाबाच्या शोधात पोलीस आहे. गेल्या आठवड्यात स्मशानभूमीत भूत काढणाऱ्या चुटकी वाल्या बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. चुटकीवाल्या बाबाची बंद खोली पोलिसांनी पंचांना घेऊन उघडली असता त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीला आल्या.
advertisement
छाप्यात काय काय सापडलं?
कंडोमची पाकिटे,जनावरांच्या कवट्या, गंडे दोरे काळ्या बाहुल्या, किंमती घड्याळांचे कलेक्शन आणि अनेक मुला मुलींचे टाचण्या मारलेले फोटो अशा अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या तर अघोरी कृत्यासाठी लागणारे सगळे साहित्य त्याच्या घरात आढळून आले.चुटकीवाला बाबा मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पसार झाला असून अनिसच्या रेट्यामुळे पोलिसांनी आज त्याच्या घराची झडती घेतली.
भोंदूगिरीच्या घटनांमध्ये वाढ
चुटकी बाबाच्या त्यातील अघोरी प्रयोगांमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर पोलीस यंत्रणा देखील या बाबाचा ठावठिकाणा शोधून काढण्याच्या कामाला लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोंदूगिरीच्या अशा घटना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या नावावर करणी, लिंबू कापणे, खिळे मारणे अशा प्रथा समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन या प्रकारांना आळा घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
कोल्हापुरात अघोरी प्रकार
भूत काढणे, करणी करणे यासह अनेक अघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर जादूटोणासह करणी केली जात होती. मांत्रिकाद्वारे अघोरी पूजा करत स्मशानात जाऊन भूत काढणे, करणी करण्याचे प्रकार उघड झाले आहे. कोल्हापुरात वारंवार अशा घटना घडत असूनही पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
