हनी ट्रॅपमध्ये फसवून पैसे उकळण्याचा प्रयत्न
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये फसवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप आहे. महिलेच्या त्रासाला कंटाळून चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली आहे. आमदारांनी तक्रार दाखल झाल्यानंतर कोल्हापूर आणि ठाणे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय.
advertisement
अश्लील चॅट, फोटो व धमकीचे मेसेज पाठविले
चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील बहिण आणि भावाला या तपासात अटक करण्यात आली आहे. मांडेदुर्ग येथील मोहन जोतिबा पवार आणि त्याची बहिण शामल पवार या बहीण-भावाने मिळून वर्षभरापासून आमदार पाटील यांना वेगवेगळ्या नंबरवरून अश्लील चॅट, फोटो व धमकीचे मेसेज पाठविले होते, असा आरोप तक्रारीमध्ये केला गेला आहे. पोलीस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत.
नंबर ब्लॉक केले, तरीही...
दोन्ही भावाबहिणींनी आमदार साहेबांसोबत मैत्रीची इच्छा दाखवली अन् चॅटिंग सुरू केली. त्यानंतर राजकीय प्रतिमा मलिन करू, अशी धमकी देखील दिल्याचं आमदारसाहेबांनी तक्रारीत म्हटलं आहे. दोन-तीन वेळा मिळून एकूण 10 लाखांची मागणी केली. सुरुवातीला सहन केलेल्या त्रासामुळे आमदार पाटील यांनी संबंधित नंबर ब्लॉक केले, तरीही नवनवे नंबर वापरून हा त्रास सुरूच राहिला, असं म्हणत चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदवली होती.