कोल्हापूर : कर्नाटक सरकारचं बेळगावात अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. पण या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने बंदी घातली. तसंच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश नाकारला. बेळगावात आंदोलन करणाऱ्या शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना अटकसुद्धा करण्यात आली आहे. बंदी असतानाही नेते बेळगावात आल्यानं पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
advertisement
बेळगावात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना फरफटत नेत ताब्यात घेतलं. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या अडवल्या. यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर कोल्हापुरातील शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे.
सकाळी 10 वाजता बाईक रॅली काढत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते बेळगावमध्ये दाखल झाले. बेळगावात आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बॉर्डरवर सुद्धा बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.त्यामुळे याठिकाणी आता वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. मराठी भाषिकांवर अन्यायाची परीसीमा सरकारने गाठली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
मराठी भाषिक कसे जगत आहेत हे महाराष्ट्र सरकारने, नेत्यांनी बघावं. सीमा भागातल्या मराठी माणसांची स्थिती बघावी. जनतेला कसे हाल सहन करावे लागत आहेत हे महाराष्ट्र सरकारने बघावं. मराठी भाषिकांना फरफटत ओढत हे पोलीस आम्हाला अटक करून नेत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी मराठी भाषिकांच्या लढ्याचे चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर दडपशाही सुरूच ठेवली आहे. यंदाही महामेळाव्यास परवानगी देण्यात आली नाही. शिवाय मराठी भाषिकांचा निर्धार पाहता महामेळावा होऊच नये यासाठी परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊ नयेत यासाठी सर्व प्रवेशमार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून, या प्रत्येक मार्गावर कानडी पोलिसांच्या छावण्या टाकण्यात आल्या आहेत.
कर्नाटक प्रशासनाकडून कितीही जोर जबरदस्ती करण्यात आली तरीसुद्धा धर्मवीर संभाजी महाराज चौकासह अन्य एका पर्यायी ठिकाणी महामेळावा घेणारच असल्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आला आहे. तर यापूर्वीचा अनुभव पाहता, पदाधिकाऱ्यांची रातोरात धरपकड होण्याची शक्यता असल्याने, सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.