प्रीतम प्रकाश कांबळे असं आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. प्रीतमला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम कांबळे याचं गावातील एका वेगळ्या जातीच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या घरच्यांना हे संबंध अजिबात मान्य नव्हते. त्यांनी या प्रेमसंबंधाला वारंवार कडाडून विरोध केला. त्यांनी प्रीतमला समज देण्याच्या नावाखाली वेळोवेळी मानसिक त्रास देणं सुरू केलं. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून प्रीतमने २ ऑक्टोबर रोजी 'ग्रामोझोन' नावाचं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
advertisement
या प्रकारानंतर गंभीर अवस्थेत प्रीतमला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी (१० ऑक्टोबर) पहाटे त्याचा मृत्यू झाला. प्रीतमच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सीपीआर रुग्णालयात जमा झाले. मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच प्रीतमने आत्महत्या केल्याचा आरोप करत नातेवाइकांनी आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे रुग्णालयाबाहेर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
प्रीतमची आई राणी प्रकाश कांबळे (वय ४०, रा. हिरवडे खालसा) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, कृष्णात भिवा पाटील, सविता कृष्णात पाटील आणि धनाजी महादेव पाटील (तिघेही रा. हिरवडे खालसा) या तिघांनी मुलीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून प्रीतमला सतत मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे. पोलिसांनी तातडीने या तिन्ही संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली. करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत.