कोल्हापूर माझे राज्यातील सर्वांत आवडते शहर!
खूप दिवसांनी तुम्ही कोल्हापूरमध्ये तीन-चार दिवसांच्या दौऱ्यावर आला आहात, इकडे जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा लढविण्याचे नियोजन आहे काय? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर त्यांनी कोल्हापूर शहराचे वेगळेपणे अधोरेखित केले.
वातावरण चांगले आहे, तांबडा पांढरा रस्सा फार छान मिळतो!
मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रातील अशी काही गावे आहेत तिथे जायला आणि राहायला मला नक्की आवडते. त्यापैकीच एक शहर म्हणजे कोल्हापूर. येथे हवा चांगली आहे, वातावरण चांगले आहे. तांबडा पांढरा रस्सा फार छान मिळतो.
advertisement
पुढे बोलताना पवारांनी कोल्हापूरकरांच्या रांगड्या स्वभावाबद्दलही सांगितले. सोमवारी (काल) मी एका ठिकाणी जात होतो. पोलिसांनी तिन्ही बाजूचे रस्ते अडवले होते. त्यावर गाडीत बसलेल्या सहकाऱ्याला मी म्हणालो, हे काही चांगले नाही. रस्ते अडवले नाही पाहिजेत. त्यावर ते मला म्हणाले, वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलीस असे करतात. लोकांनाही त्याचे कौतुक वाटते.
कोण सुक्काळीचा चाललाय ह्यो...!
मी त्यांना म्हणालो, लोकांना याचे कौतुक वाटते की नाही हे मला माहिती नाही. पण आजपर्यंत लहानपणापासून मी कोल्हापुरात येतो तेव्हा मी ऐकत आलोय म्हणा किंवा शिकलोय म्हणा, ज्यांच्या गाड्या थांबवल्यात ते समोरच्याला उद्देशून म्हणतात कोण चाललाय ह्यो सुक्काळीचा....! पवारांच्या या किस्सावर पत्रकार परिषदेत खसखस पिकली. ते स्वत:ही काही वेळ हसत होते. सरतेशेवटी बस्स झाले, चला आता म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेला पूर्णविराम दिला.
