तन्मय यांनी 2022 साली स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. ही त्यांची तिसरी अटेम्प्ट होती. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आले तरी त्यांनी हार मानली नाही. स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवत, सातत्याने प्रयत्न करत त्यांनी अखेर राज्य सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. या निकालानंतर तन्मय यांची निवड नगर परिषद मुख्य अधिकारी किंवा महापालिका उपायुक्त या पदासाठी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
advertisement
त्यांच्या आयुष्यातील प्रवास मात्र सोपा नव्हता. वडिलांचे निधन झाल्यानंतर घरातील जबाबदारी एकहाती आईने उचलली. आई अंगणवाडी सेविका असून, त्यांनी तन्मय यांना शिक्षण आणि अभ्यासासाठी पूर्णपणे साथ दिली. मर्यादित साधनसंपत्ती असूनही आईने मुलाच्या स्वप्नासाठी प्रत्येक क्षणी त्याला प्रेरणा दिली. तन्मयही आईच्या कष्टाचे चीज करायचे ठरवून रात्रंदिवस अभ्यासात गुंतले होते. तन्मय सांगतात, स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर मानसिक तयारीही आवश्यक असते. प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकायला मिळतं.
तन्मयला हे परिक्षेत यश आईच्या आशीर्वादाने, कुटुंबाच्या पाठिंब्याने आणि मित्रांच्या साथीमुळे शक्य झालं आहे. आज त्यांच्या यशामुळे इचलकरंजी शहरात आणि कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण आहे. स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी त्यांचा कौतुक करत आहे. तन्मय यांचं यश हे केवळ वैयक्तिक नाही, तर ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, दृढ निश्चय आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न साकार करता येतं. तन्मय मांडरेकर यांचं हे यश अनेक तरुणांसाठी दिशा दाखवणारं ठरेल, यात शंका नाही.