निलेश राणे आणि नितेश राणे... हे सख्खे भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. कणकवली नगरपरिषदेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचं पाठबळ असलेली कणकवली शहर विकास आघाडी असा थेट सामना होणार आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, भाजपला टक्कर
भाजपनं सिंधुदुर्गात स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपाविरोधात सर्वपक्षीयांनी कणकवली शहर विकास आघाडीची मोट बांधली. विशेष म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकवटलीय. ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. त्यामुळे कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत राणे- विरुद्ध राणे असा सामना रंगला आहे.
advertisement
'कणकवलीनं शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणलं, 'कणकवलीकर नेहमी राणेंच्या बाजूनं नेहमी राहिलेत', असे मंत्री नितेश राणे म्हणाले. तर 'महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र युती झाली नाही ज्यांना आमच्यासोबत युती करायची त्यांच्याशी युती झाली', असे म्हणत त्यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.
वरवर पाहाता भाजप आणि स्थानिक विकास आघाडी अशी लढत दिसत असली तरी खरी लढत ही निलेश राणे आणि नितेश राणेंमध्ये असल्याचं चित्र आहे.
दोन भावांमध्ये आरोप प्रत्यारोप
'कुणी कुणासोबतही निवडणूक लढावी, आम्ही फक्त विकासावरच बोलणार', असे नितेश राणे म्हणाले. तर 'विकास हाच आमचा अजेंडा असेल, गेल्या दहा वर्षांपेक्षा चांगला विकास करण्याचा प्रयत्न करणार, असे प्रत्युत्तर निलेश राणे यांनी दिले.
राणे विरुद्ध राणे लढाईत कोण जिंकणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जाताहेत. या निमित्तानं नवनवीन युत्या आणि आघाड्या जन्माला आल्यात. आता तळकोकणातील या राजकीय लढाईत राणे विरुद्ध राणे या सामन्यात सिंधुदुर्गातील जनता कोणत्या राणे बंधूंच्या पारड्यात मताचं दान टाकतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
